परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!

Monday, March 9, 2020

एकाच घरातील क्रमशः संख्या खेळ.

गणितीय खेळ~
*एकाच घरातील क्रमशः संख्या खेळ*

खेळाची कार्यवाही~
(०१) शालेय पटसंख्येनुसार व तसेच शालेय मैदानाच्या क्षेत्रफळानुसार दहा-दहा विद्यार्थ्यांचे दोन गट/ तीन गट/....... गट तयार करण्यास सांगा/ तयार करून घ्या.
(०२) गटाच्या संख्येनुसार कोणत्याही एका संख्या घरातील संख्या संच उपलब्ध करा, जसे- समजा दहा दहा चे दोन गट असेल तर दोनही गटासाठी एकाच घरातील संख्याकार्डे घ्या. उदा.- ३१ या संख्येचे घर घ्यायचे ठरविले असल्यास त्या घरातील ३१, ३२, ३३, ३४,........., ४० पर्यंतची संख्याकार्डे घ्या.(३१ च्या घरातील सर्व संख्यांचे दोन संच याप्रमाणे तीन गटासाठी तीन संच, चार गटासाठी चार संच.)
(०३) गटात संख्याकार्ड संच वाटत असताना आपल्या गटातील कोणत्याही मित्राला आपापली संख्या माहीत होणार नाही याची दक्षता घ्या/ दक्षता घेण्यास सांगा.
(०४) आपापली संख्या कोणत्या संख्येच्या घरातील आहे हे दशक स्थानच्या अंकावरून व त्या घरातील कोणत्या क्रमांकाची आहे हे एकक स्थानच्या अंकावरून
लक्षात ठेवण्यास सांगा.
(०५) खेळ खेळण्यासाठी अंतिम रेषा व आरंभ रेषा आखा.
(०६) खेळ कसा खेळावा यासंदर्भाने प्रात्यक्षिक मार्गदर्शन करा. जसे- सुलभकाने शिट्टी वाजवताच किंवा एक, दोन, तीन Go म्हणताच आपापल्या गटातील प्रत्येकांनी आरंभ रेषेवरून क्रमश संख्येनुसार धावत जाऊन अंतिम रेषेपासून एकामागे एक याप्रमाणे उभे राहण्यास सांगा.
(०७) जो गट सर्वात प्रथम अचूक व क्रमश संख्येनुसार धावत जाऊन एकामागे एक याप्रमाणे उभे राहील त्या गटाला विजयी घोषित करावे.(३१, ३२, ३३, ३४, ३५, ३६, ३७, ३८, ३९, ४० याप्रमाणे)
(०८) आता क्रमश  संख्येनुसार उभे राहिलेल्या सर्व गटांना खालील प्रमाणे प्रश्न विचारा.

*(क) कोणत्याही एका गटाला विचारात घेऊन व एखाद्या विद्यार्थाचे नाव घेऊन दिलेल्या संख्येच्या घरातील तुझा क्रमांक कितवा?
(ख) या गटातील कोणत्याही एका विद्यार्थ्याला तुझ्यापासून मागच्या/ पुढच्या दुसऱ्या/ तिसऱ्या/ चौथ्या,........ व्या विद्यार्थ्यांची त्या विद्यार्थ्याचे नाव घेऊन कोणती संख्या आहे?
(ग) एखाद्या विद्यार्थ्याचे नाव घेऊन तुझी संख्या कोणती? तुझ्या संख्येतील एकक/ दशक स्थानचा अंक कोणता?
(घ) गटातील सम/ संख्या असणाऱ्यांनी हात वर करा.
(च)...... दशक..... एक असणारा विद्यार्थ्यांनी एक उडी मारा/ हात वर करा. जो गट सर्वात आधी हात वर करेल उडी मारेल त्या गटाला एक गुण द्या. किंवा त्या गटाचे टाळ्या वाजवून कौतुक करा. (छ)..... एकक...... दशक संख्या कार्ड असणाऱ्या विद्यार्थ्याने हात वर करा.
(ज) सुचविलेल्या कोणत्याही दोन संख्याकार्डे असलेल्या विद्यार्थ्यांना रांगेतून थोडे डावीकडे वा उजवीकडे बाजूला होण्यास सांगा. त्यापैकी लहान/ मोठी संख्या असणार्‍या विद्यार्थ्याने खाली बसून लगेच उभे राहावे. ज्या गटातील विद्यार्थी सर्वात आधी सूचनेनुसार कृती करेल त्या गटाला एक गुण द्यावा.
(झ) ....... बेरीज येणारी तुमच्या गटातील दोन संख्याकार्डे कोणती?
(ट) तुमच्या गटातील सर्वात लहान/ सर्वात मोठी संख्या कोणती?
(ठ) तुमच्या गटातील सर्वात लहान समसंख्या कोणती?
(ड) तुमच्या गटातील सर्वात लहान विषम संख्या कोणती?
(ढ) तुमच्या गटातील सर्वात मोठी सम संख्या कोणती?
(ण) तुमच्या गटातील सर्वात मोठी विषम संख्या कोणती?
(त) तुमच्या गटातील कोणत्या दोन संख्यांची बेरीज....... आहे?
(थ).......ही संख्या कोणत्या संख्येच्या पाढ्यात आहे? (उदा. ३५ ही संख्या घेऊन)
(द)....... या संख्येतील अंकांची अदलाबदल केल्यास कोणती संख्या तयार होईल?
(ध) तुमच्या घरातील किती संख्यांमध्ये दशक समान आहे?
(न) तुमच्या घरातील वेगळा दशक असणारी संख्या कोणती? किंवा तुमच्या गटातील वेगळा दशक असणारी संख्या कोणती?
(प) तुमच्या गटातील.... एकक +....... एकक असलेली संख्या कोणती?
(फ) तुमच्या गटातील कोणत्याही तीन विद्यार्थ्यांनी डावीकडे/ उजवीकडे थोडे बाजूला व्हावे व चढता क्रम/ उतरता क्रम लावा. सुचनेनुसार जो गट सर्वात आधी क्रम लावेल त्याला एक गुण द्यावा.
(ब) तुमच्या गटातील.... या संख्या पासून ....... या संख्येचा कितवा क्रमांक आहे?
(भ) तुमच्या ओळीत/ गटात एकूण मुले किती?
(म) तुमच्या गटात/ओळीत एकूण मुली किती?
(य) तुमच्या ओळीत/गटात एकूण विद्यार्थी किती? (र) तुमच्या गटात दशक व एककस्थानी सारखे अंक असणारी संख्या कोणती?
(ल) तुमच्या ओळीतील क्रमाने अंक असणारी संख्या कोणती? जसे-३४ होय.
(व) तुमच्या गटातील .......या संख्येचे विस्तारित रूप सांगा.
(श) तुमच्या गटातील कोणत्याही दोन संख्या घेऊन सुचविलेल्या(बेरीज/वजाबाकी/गुणाकार/भागिकार) क्रियेवर आधारित शाब्दिक उदाहरण तयार करा. (ष) .....या संख्येच्या लगतची मागची/पुढची संख्या सांगा.
(स) हवेत गिरविलेली संख्या  कोणती? सुलभकाने गटातील कोणतीही एक संख्या हवेत गिरवावी.*

सदरील प्रश्नांवर आधारित गुण द्या. ज्या गटाला सर्वात जास्त गुण मिळेल त्या गटाला विजयी घोषीत करा.

   याप्रमाणे हा गणितीय खेळ शाळेत घ्यावा.

टिप~ *सदरील खेळ हा उलटक्रमाने सुध्दा घेता येतो.*

*अध्ययन निष्पत्ती*~
(०१) संख्यांचे अचूक वाचन करतात.
(०२) घरातील संख्याक्रम लक्षात घेतात.
(०३) लहान-मोठी संख्या ओळखून सांगतात.
(०४) ओळीतील/गटातील/स्तंभातील दोन पेक्षा अधिक संख्यांचा चढता-उतरता क्रम लावतात. (०५) संख्येतील एकक, दशक स्थानचा अंक कोणता ते सांगतात.
(०६) संख्येची विस्तारित रूपात मांडणी करतात. (०७) सूचनेनुसार अचूक कृती करतात.
(०८) संख्या स्थाने मोजतात. कितवा ते सांगतात. मूल्यवाचक, क्रमवाचक संख्या सांगतात.
(०९) दोन संख्यांचा दशक-एकक निरीक्षणावरून लहान मोठेपणा लक्षात घेतात.
(१०) खेळातून संख्यांची उजळणी सराव व दृढीकरण होते.
(११) सूचविलेल्या कोणत्याही दोन संख्यांची बेरीज/वजाबाकी तोंडी करतात.
(१२)  मागची-पुढची संख्या यावरूनलहान-मोठेपणा ठरवितात.
(१३) गटातील कोणत्याही दोन संख्या घेऊन सुचविलेल्या क्रियेवर आधारित शाब्दिक उदाहरणे तयार करतात.
(१४) मनात उदाहरणे सोडवितात व उत्तर सांगतात. (१५) सुचविलेली संख्या दाखवितात.
(१६) लगतची मागची-पुढची संख्या सांगतात.
(१७) हवेत गिरविलेली/लिहिलेली संख्या सांगतात/ओळखतात.*

संकल्पना व लेखन~
संतोष मो. मनवर
जि.प.उ.प्रा.शाळा पंचाळा पं.स. मानोरा.
जि.प. वाशिम
मो. क्र. ९४०४१३९११६

No comments:

Post a Comment

****